भाजीबाजारात कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:41+5:302020-12-13T04:33:41+5:30
खड्डा बुजवलाच नाही ! अकोला : श्रीवास्तव चौक ते डाबकीरोड पोलीस ठाण्याच्या मार्गावर कामगार कल्याण मंडळासमोर विद्युत वाहिनीच्या कामासाठी ...
खड्डा बुजवलाच नाही !
अकोला : श्रीवास्तव चौक ते डाबकीरोड पोलीस ठाण्याच्या मार्गावर कामगार कल्याण मंडळासमोर विद्युत वाहिनीच्या कामासाठी माेठा खड्डा खोदण्यात आला आहे. हा खड्डा अद्यापही कायम असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
पथदिवे बंद
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टॅन्ड मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. या मार्गावरील जड वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता बळावली आहे.
नळजोडणी वैध करा !
अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेतली जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असल्याने नागरिकांनी नळजोडणी वैध करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धिंग्रा चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला : शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या धिंग्रा चौकात शनिवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटोचालकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती. वाहतूक शाखा पाेलिसांनी अडथळा दूर केला.
डासांची पैदास वाढली
अकोला : शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने धुरळणी करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर बांधकाम साहित्य
अकोला : जुने शहरातील गुलजारपुरा भागातील मुख्य रस्त्यावर माेठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य पडून आहे. यामध्ये रेतीचा समावेश असून, अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सदर साहित्य मनपाने जप्त करण्याचे निवेदन शुक्रवारी नागरिकांनी दिले.
रस्त्यावरील बॅरिकेड्स निरुपयाेगी !
अकोला : एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्याच्या सबबीखाली गांधीरोडवर मुख्य चौकात पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावले. प्रशासनाचा मूळ उद्देश अपयशी झाला असून, या बॅरिकेडला लागूनच अतिक्रमणधारकांनी व्यवसाय थाटला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे.
खड्डा ठरतोय जीवघेणा
अकोला : गीतानगर ते अकोली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे.या मार्गावर शाळकरी मुलांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हं पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
जलवाहिनी फुटली
अकोला : जुने शहरातील रघुवीरनगरमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मनपाच्या वतीने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.