गॅस टँकर ट्रकवर आदळला, २ ठार
By admin | Published: December 5, 2014 12:09 AM2014-12-05T00:09:26+5:302014-12-05T00:09:26+5:30
अकोल्यातील शिवणी टी-पॉइंटजवळील नवीन बायपासवरील पुलावर घडला अपघात.
अकोला : गॅस वाहून नेणार्या टँकरने ट्रकला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास अकोल्यातील शिवणी टी-पॉइंटजवळील नवीन बायपासवरील पुलावर घडली. अपघातात ट्रक चालक व क्लीनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, टँकर चालक गंभीर जखमी झाला. ओआर १५ एन ६८२४ क्रमांकाचा गॅस टँकर रायपूर येथील प्लांटमध्ये एचपी कंपनीचा गॅस खाली करून शिवणीतील नवीन बायपासमार्गे मुंबईकडे भरधाव निघाला होता. टँकरने समोरून येणार्या एमएच ४0 वाय ४५७0 क्रमांकाच्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला. नागपूरकडे माल घेऊन निघालेल्या एमएच ४0 वाय ४५७0 क्रमांकाच्या ट्रकमधील चालक व क्लीनर जागीच ठार झाले, तर गॅस टँकरचा शेषराव नामक चालक गंभीर जखमी झाला. ट्रकमधील दोन्ही मृतक कॅबिनमध्ये फसले होते. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. दोघांचेही मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आले. मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
*टँकरमधून गॅस गळती
भीषण अपघात घडल्यानंतर टँकरमधून वायू गळती लागली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अतिरिक्त कुमक आणि अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब बोलावून घेतला. गॅस गळतीचा आवाज मोठय़ाने येत असल्याने, पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळाहून सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितले होते. मोबाइल फोन न वापरण्याचीही सूचना केली. अपघातग्रस्त टँकरच्या समोरच त्यांच्या एका सहकार्याचासुद्धा गॅस टँकर धावत होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळावर परतले. त्यांनीच पोलिसांना अपघातग्रस्त टँकरमधील गॅस रायपूर येथे खाली केलेला असून, उरलेल्या थोड्याफार गॅसची गळती होत असल्याचे सांगितल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.