अकाेला जिल्ह्यात गावठी दारुची विक्री करणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या;स्थानिक गुन्हे शाखेची पातूर,बाळापूर, बार्शीटाकळी,अकाेटात कारवाई
By आशीष गावंडे | Published: April 13, 2024 09:22 PM2024-04-13T21:22:20+5:302024-04-13T21:22:30+5:30
या कारवाइमुळे संबंधित पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.
अकाेला: जिल्ह्यात हातभट्टीद्वारे माेठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करुन त्याची विक्री केल्या जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाइवरुन समाेर आले आहे. दाेन दिवसांच्या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेने पातूर, बाळापूर, अकाेट व बार्शीटाकळी तालुक्यातील हातभट्ट्यांचे जाळे उध्वस्त करुन चार आराेपींना बेड्या ठाेकण्याची कारवाइ केली आहे. या कारवाइमुळे संबंधित पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.
जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यात हातभट्टीद्वारे दारु तयार करुन त्याची विक्री केली जात आहे. ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांनी गठीत केलेल्या पथकांनी शाेध माेहिम राबवली असता, ग्रामीण भागात हातभट्ट्यांचे माेठे जाळे असल्याचे निदर्शनास आले आहे. बाळापूर तालुक्यातील उरळ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम मोरगाव सादिजन येथे छापा घातला असता गजानन महादेव सोळंके (४०)रा. मोरगाव सादिजन याच्याकडून गावठी दारुसह ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पातूर तालुक्यातील चान्नी पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सस्ती शिवारातील निर्गुळा नदी पात्रात गावठी दारु तयार करणारा नतीन मोतीराम अंभोरे (३०)रा. ग्राम सस्ती यास अटक करुन त्याच्याकडून ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम टिटवा शेतशिवारात धाडसत्र राबवले असता सुरेश बाळु शिंदे (३७)रा. ग्राम टिटवा याला अटक करुन १ लाख १३ हजार ५२० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. अकोट तालुक्यातील ग्राम पोपटखेड येथील जामुन नाला येथे छापा घातला असता गजानन शंकरलाल साल्फेकर (५०) रा. पोपटखेड याच्याकडून गावठी दारुसह इतर साहित्य असा एकुण ४५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चार आराेपींना अटक; लाखाेंचे साहित्य जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे ‘पीएसआय’गोपाल जाधव, आशिष शिंदे व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, वसिमोद्दीन, एजाज अहेमद, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद अमीर यांनी चार आराेपींना अटक करीत लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माेठे मासे गळाला लागणार का?
अकाेट तालुक्याची सीमारेषा संपली की, मध्य प्रदेशची सीमा सुरु हाेते. बैतुल, बऱ्हाणपूर, पाेपटखेड आदी चाेरट्या मार्गाने अनेक नामवंत ब्रॅन्डची नक्कल असणाऱ्या अवैध विदेशी दारुची अकाेट तालुक्यात विक्री केली जात असल्याची माहिती आहे. शहरातही विदेशी दारुच्या नावाखाली बनावट दारुची विक्री करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय आहे. यामुळे पाेलिसांच्या गळाला माेठे मासे लागतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.