देवांशी गावंडे करणार १४ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:53+5:302021-06-16T04:25:53+5:30
अकाेला : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या अंतर्गत १४ वर्षांखालील मुलींच्या राज्य अजिंक्यपद ...
अकाेला : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या अंतर्गत १४ वर्षांखालील मुलींच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आयोजन ९-११जून या कालावधीत करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अकोल्याची देवांशी गावंडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला व राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळविला.
स्विस लीग पद्धतीने झालेली ही स्पर्धा एकूण नऊ फेऱ्यांमध्ये टोर्नलो या संकेतस्थळावर पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ११२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात देवांशीला या स्पर्धेत ३१ वे मानांकन देण्यात आले होते. नऊ फेऱ्यांमध्ये तिने अनेक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा पराभव करीत आठ गुणांची कमाई केली. याबद्दल तिला रोख पारितोषिक देऊन महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेकडून गौरविण्यात येणार आहे. या अगोदर झालेल्या १६ वर्षे वयोगटामध्येही देवांशीने चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेमध्ये तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे (जळगाव खान्देश), स्वप्निल बनसोड (नागपूर), विवेक सोहनी (रत्नागिरी) व विठ्ठल माधव (मुंबई) यांनी काम पाहिले. ती कोठारी कॉन्व्हेन्टची विद्यार्थिनी असून, तिला शाळेच्या मुख्याध्यापिका कडलास्कर मॅडम आणि दांडळे सर यांचे प्रोत्साहन मिळाले आहे.