पाणीटंचाई,अधिकाऱ्यांच्या अरेरावीवर गाजली सभा

By admin | Published: April 4, 2017 01:43 AM2017-04-04T01:43:56+5:302017-04-04T01:43:56+5:30

महापौरांची अजय शर्मा, राजेश मिश्रा सोबत चकमक

Gazoli meeting on water scarcity | पाणीटंचाई,अधिकाऱ्यांच्या अरेरावीवर गाजली सभा

पाणीटंचाई,अधिकाऱ्यांच्या अरेरावीवर गाजली सभा

Next

अकोला: शहरातील जुन्या प्रभागांसह नवीन मलकापूर, शिवनी, शिवर तसेच डाबकी प्रभागात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. हातपंप नादुरुस्त आहेत. अशा स्थितीत नागरिकांची पाणीपट्टी तपासताना जलप्रदाय विभागाचे अधिकारी उर्मट भाषा वापरतात. त्यांना आवर घालण्याच्या मागणीवर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. हा प्रकार कमी म्हणून की काय, महापौर विजय अग्रवाल यांची भाजप नगरसेवक अजय शर्मा, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे सभागृहात पाहावयास मिळाले.
मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या मलकापूर, डाबकी, शिवनी आदी भागात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. महान धरणावरून खडकी भागाला पाणीपुरवठ्याची सोय होऊ शकते. अशावेळी मलकापूर भागाला का नाही, असा सवाल उपस्थित करून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी असा भेदभाव करणे योग्य नसल्याचा मुद्दा शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी साफसफाई, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आदी विषयांवर भाजप गटनेता राहुल देशमुख, सुमनताई गावंडे, योगीता पावसाळे, उषा विरक, सुनीता अग्रवाल, सतीश ढगे, मंजूषा शेळके, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, गजानन चव्हाण, विनोद मापारी, अनिता दुबे, सोनी आहुजा, आम्रपाली उपर्वट, काँग्रेसचे गटनेता साजिद खान, नगरसेवक अ‍ॅड. एक्बाल सिद्दिकी, रहीम पेंटर, पराग कांबळे, शाहीन अंजूम महेबुब खान, चांदनी शिंदे, मोहम्मद इरफान तसेच मोहम्मद मुस्तफा यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
सभेला सुरुवात होताच भाजप, सेना, काँग्रेसचे नगरसेवक साफसफाईच्या मुद्यावर पोटतिडकीने बोलू लागले.
सर्व नगरसेवक एकाच वेळी बोलत असल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी विषयाला सोडून बोलू नका, असे भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी इतर नगरसेवकांना उद्देशून म्हणताच महापौर विजय अग्रवाल यांचा अचानक पारा चढला. मला सल्ला देऊ नको, मी येथे आहे असे म्हणताच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर गटनेता राहुल देशमुख यांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले.

महापौर, सेनेचे गटनेता आमनेसामने
शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी उपस्थित केलेल्या मलकापूर येथील पाणीटंचाईच्या मुद्याकडे महापौर,आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच गटनेता राजेश मिश्रा यांनी बाजू सांभाळली. सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक प्रश्न उपस्थित करीत असताना त्यावर उत्तर देण्यासाठी एकही अधिकारी बोलत नसल्याचे सांगत गटनेता राजेश मिश्रा यांनी महापौर साहेब, हा पोरखेळ थांबला पाहिजे. नगरसेवकांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, असे म्हणताच महापौर विजय अग्रवाल यांनी येथे मजाक सुरू नाही. मी महापौर या नात्याने उत्तर देतोय ना, मग होतील कामे, असे राजेश मिश्रा यांना सुनावले.

सेना नगरसेवकांची मुस्कटदाबी
सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाकडे महापौरांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. हाच अनुभव काँग्रेसच्या नगरसेवकांना आला. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी याबाबतीत खासगीत नाराजी व्यक्त केली. शिवसेना नगरसेवकांची मुस्कटदाबी केल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती.

महापौर अधिकाऱ्यांच्या भूमिकेत?
मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असून क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, पथदिवे दुरुस्त करणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या विषयावर नगरसेवकांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले. नगरसेवकांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित असताना प्रत्येक प्रश्नाला महापौर विजय अग्रवाल सामोरे गेले हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Gazoli meeting on water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.