अकोल्यात १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक; आचारसंहिता लागू
By रवी दामोदर | Published: October 4, 2023 03:40 PM2023-10-04T15:40:35+5:302023-10-04T15:40:45+5:30
डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
अकोला : डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तसेच विविध कारणांनी सदस्य किंवा सरपंच पदे रिक्त झालेल्या ४० ग्रामपंचायतींत पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केला. त्यामुळे ग्रामीण भागात राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व रिक्त जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार तहसीलदारांकडून दि. ६ ऑक्टोबरला निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची वेळ दि. १६ ते दि. २० ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे दि. २५ ऑक्टोबर रोजी मागे घेता येतील, तर त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी व निकाल दि. ६ नोव्हेंबर रोजी घोषित केल्या जाणार आहे.
५६ ग्रा.पं. सदस्य, ३ थेट सरंपच पदासाठी पोटनिवडणूक
जिल्ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ५६ ग्रामपंचायत सदस्य व ३ थेट सरपंच अशा एकूण ५९ पदांची पोटनिवडणूक होणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या १४ ग्रामपंचायतींची १४ सरपंच पदे व १११ सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
या ग्रा.पं साठी सार्वत्रिक निवडणूक
- तेल्हारा - पिंपरखेड, झरीबाजार, बारखेडा- मूर्तिजापूर - घुंगशी, गाजीपुर (टाकळी)
- अकोला - काटीपाटी, एकलारा, कापशी रोड, मारोडी
- बार्शीटाकळी - खोपडी, दोनद खु, खांबोरा, जांभरून,
- पातूर - कोसगांव