अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:50 PM2019-02-22T16:50:25+5:302019-02-22T16:56:43+5:30
अकोला : अकोला महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी ‘अमृत’ योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला.
अकोला : अकोला महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी ‘अमृत’ योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. यावेळी गोंधळी सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात येऊन गोंधळी सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.
अमृत योजनेवर चर्चा करण्याचे आश्वासन महापौरांनी मागच्या सभेत दिल्यानंतरही शुक्रवारी पार पडलेल्या सभेत चर्चा घेण्यात आली नाही. मागच्य सभेतच चर्चा झाल्याने या सभेत चर्चा घेण्यात येणार नसल्याचे महापौरांनी सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व इतर सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला; परंतु गोंधळी सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
यावेळी त्यांनी महापौरांशी वाद घालत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला तसेच माईकही तोडला. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवित राजेश मिश्रा यांना बाजूला ओढले, तर महापौरांनीही राजदंड घट्ट पकडून ठेवला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या दोन्ही सदस्यांना सभागृहाबाहेर नेले. या प्रकारानंतर दोन्ही नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुढे सुरु करण्यात आले.