अकोल्यात जातिवंत बोकडांचा स्वतंत्र बाजार!
By Admin | Published: September 3, 2016 02:20 AM2016-09-03T02:20:11+5:302016-09-03T02:20:11+5:30
दलालांना फाटा; पशू विज्ञान संस्थेचा शासकीय स्तरावरील राज्यातील पहिला प्रयोग.
अकोला, दि. २ : शेतकर्यांना योग्य दर मिळावेत, याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातिवंत, निरोगी बोकडांचा स्वतंत्र बाजार भरविण्यात येत असून, आतापर्यंत २00 शेतकर्यांनी त्यांच्याकडील शेळी, बोकडांची नोंद केली आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता स्नातकोत्तर पशुवैद्यकीय, पशू विज्ञान संस्था व जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ३ ते १0 सप्टेंबरपर्यंत बोकड प्रदर्शन व विक्री बाजार भरविण्यात येत आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानल्या जात आहे.
शेतीला पूरक पशूपालन, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोकड, शेळी, कुक्कुट पालन हे कमी खर्चाचे अधिक उत्पादन देतात. यासाठीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. भविष्यातील बोकड, शेळी उत्पादन व्यवसायाचे महत्त्व आहे. त्या दृष्टीने पशुविज्ञान संस्थेने शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यात प्रथमच निरोगी व जातिवंत बोकड प्रदर्शन भरविण्याचा निर्णय स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशू विज्ञान संस्था व पशुसंवर्धन विभागाने घेतला असून, संस्थेच्या आवारात ३ सप्टेंबरपासून १0 दिवस हे प्रदर्शन राहणार आहे. बोकडांची दलालामार्फत विक्री होत असल्याने उत्पादकांना योग्य दाम मिळत नाहीत. ग्राहकांना जातिवंत व निरोगी बोकड मिळावेत व शेतकरी उत्पादकांनाही योग्य दर मिळावेत, हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
सध्या बोकडाचे दर वाढले असून, पुणे जिल्हय़ातील लोणंद येथील एका शेतकर्यांकडील बोकडाची किंमत ६0 हजार रुपये आहे, तर औरंगाबाद जिल्हय़ात हीच किंमत लाखावर पोहोचली आहे. बोकड निर्यातीला चांगला वाव असून, नुकतेच नाशिक येथील विमानतळावरू न १६00 बोकडांची आखाती देशात निर्यात करण्यात आली आहे. पूर्वी कांडला बंदरातून जहाजाने बोकड विदेशात पाठवले जात होते. बर्याच बोकडांचा जलमार्गाच्या सहा ते सात दिवसाच्या प्रवासात मृत्यू होत होता. आता चार ते पाच तासांत जवळच्या देशात निर्यात करण्यात येत आहे.
कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळला, तर निश्चितच शेतकर्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, या अनुषंगाने शेळी, मेंढी, कुक्कुट पालन प्रशिक्षण शेतकर्यांना देण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर त्यांच्याकडील पशूंना योग्य दर मिळावेत म्हणून विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
- डॉ.हेमंत बिराडे,
अधिष्ठाता,
स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था, अकोला.