साहेबांनो, यंत्रणांना समजावा जरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:08+5:302021-05-11T04:19:08+5:30
अकाेला : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अकोला जिल्ह्यात शनिवार, दि. १५ मेच्या रात्रीपर्यंत निर्बंध अधिक कडक करण्यात ...
अकाेला : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अकोला जिल्ह्यात शनिवार, दि. १५ मेच्या रात्रीपर्यंत निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत; पण ते करताना यंत्रणांना संवेदनहीन बनून चालणार नाही. अडल्या नाडलेल्या, अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही चौकाचौकांत अडवून त्यांचा छळ मांडला जाणार असेल तर कोरोना परवडला, पण यंत्रणा आवरा, असे म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण बंद अथवा कडक निर्बंध लागू करताना काही अत्यावश्यक सेवांना त्यातून वगळण्याचे निर्देश आहेत. मात्र, दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांनाच काय, काही डॉक्टरांनाही अडविले गेल्याच्या तक्रारी आहेत. लसीकरणासाठी निघालेल्या ज्येष्ठांनाही दंडुके दाखविण्याची मग्रुरी काय कामाची? मुळात, आज दाखविली जाते आहे तेवढी खबरदारी यापूर्वीच घेतली असती व बिनकामाचे फिरणाऱ्यांना तसेच गर्दी करणाऱ्यांना अटकाव केला असता तर संपूर्ण बंद करण्याची वेळच आली नसती; पण असो, नागरिक स्वतःहून ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना ऐकविण्याची वेळ यंत्रणांवर येऊन ठेपली आहे हे खरे; परंतु वास्तविकता पाहून संवेदनेने काही विचार केला जाणार आहे की नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य संबंधित मान्यवरांनीही कोरोनाच्या अटकावसाठी निर्बंध घालताना उगाच कुणाची अडवणूक होणार नाही याकडे लक्ष पुरविण्यास सांगितले आहे. जे सबळ कारणाखेरीज फिरत आहेत त्यांच्यावर दंडुका उगारायलाच हवा, परंतु दवाखान्यात अगर लसीकरणास निघालेल्यांना तसेच अत्यावश्यक सेवेतील सेवार्थीना अडवू नका. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक श्रीधर साहेब, बारकाईने अभ्यास करून तळागाळापर्यंत सक्षमपणे यंत्रणा राबविण्यात वाकबगार असल्याचा आपला लौकिक आहे. तेव्हा रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या यंत्रणांना जरा संवेदनशीलतेने वागायला सांगा, अंगात आल्यासारखे करू नका म्हणाव. ही वेळ संकट रोखण्याची आहे, तशी संबंधितांच्या दुःखावर सहानुभूतीची व अडचणीवर सहकार्याची फुंकर घालण्याची आहे. आपण सारे मिळून ते करूया व कोरोनाला हरवूया, तूर्त इतकेच।