‘जीओ’कडून विनापरवाना खोदकाम; ठेकेदाराविरूद्ध पोलिसांत तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 03:49 PM2018-10-09T15:49:07+5:302018-10-09T15:49:17+5:30
वाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने तत्काळ खोदकाम सुरू असलेले स्थळ गाठून विनापरवाना खोदकाम करणारा ठेकेदार पंडित सोनवणे याच्याविरूद्ध शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, खोदकामस्थळी मशीन बेवारस सोडून मजूरवर्गही पसार झाल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागात पुरेशा गतीने नेट कनेक्टिव्हिटी पोहचविण्यासाठी ‘जीओ’ कंपनीकडून भूमिगत आॅप्टिकल केबल टाकले जात आहेत. हे काम करित असताना शेतकºयांच्या शेतातील उभी पिके तद्वतच मोठमोठी झाडेही जमिनदोस्त होत आहेत. दरम्यान, मालेगाव-शिरपूर रस्त्यावर सुरू असलेला हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणून यासंबंधी सखोल चौकशी केली असता, संबंधित ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यावर खोदकामासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानुषंगाने ८ आॅक्टोबरच्या अंकात यासंंबंधी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग वाशिम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता साईप्रसाद दिनेशराव मुनगिलवार यांनी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार, सदर कामाची ठेकेदार पंडित सोनवणे याने कुठलीही परवानगी न घेता खोदकाम केल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, असे तक्रारीत नमूद आहे.