भूगोलचा पेपर रद्द झाल्याने जिल्हयातील ३0 हजारावर विद्यार्थ्यांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 04:57 PM2020-04-13T16:57:30+5:302020-04-13T17:00:24+5:30
जिल्हयातील ३0 हजार ७८५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकोला: इयत्ता दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्चपर्यंत होणार होती. उर्वरित दहावीचे पेपर उत्साहात पार पडले. परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दहावीचा भूगोल व कार्यशिक्षणाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्यामुळे शिक्षण विभागाने भूगोल, कार्यशिक्षणाचा पेपरच रद्द केला आहे. त्यामुळे जिल्हयातील ३0 हजार ७८५ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पेपर रद्द झाल्यामुळे विद्यार्थी टेंशनमुक्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा सुरळीत पार पडली. केवळ भूगोल, कार्यशिक्षणाचा पेपर शिल्लक होता. परंतु अचानक कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे शालेय शिक्षण विभागानेहा पेपर पुढे ढकलला. लॉकडाऊन संपल्यानंतर हे दोन्ही पेपर घेण्यात येतील आणि त्याची तारिख कळविण्यात येईल. असे सांगण्यात आले होते. मात्र, कोरोनाचे बाधित रूग्ण वाढतअसल्यामुळे आणि परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याने, शिक्षण विभागाने अखेर भूगोल व कार्यशिक्षण या दोन्ही विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पेपरचे प्रचलित व ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना गूण देण्यात येणार आहे. परंतु ते गूण कसे देण्यात येतील. याविषयी संभ्रम आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना दोन पेपरची चिंता सतावत होती. कोरोनाच्या सावटात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत होता. अखेर हे दोन पेपर रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पेपर रद्द झाल्याचा निर्णय कळताचविद्यार्थ्यांनी भूगोल, कार्यशिक्षणाचा अभ्यास बाजुला ठेऊन पुस्तके कपाटात ठेऊन दिली. सध्या मुले टेंशनमुक्त झाली आहेत. (प्रतिनिधी)