तेल्हारा शहरात ३ रुपयांत मिळवा लाखो रुपयांची जागा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:52+5:302021-04-25T04:17:52+5:30
शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त! प्रशांत विखे तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत ...
शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त!
प्रशांत विखे
तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे; मात्र याचाच फायदा घेत अतिक्रमणधारकांनी रस्त्यांवर टपऱ्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे नगर परिषदेला प्रत्येकी ३ रुपये खोका उत्पन्न मिळणार असल्याने न.प.ची अतिक्रमणाला मूकसंमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात एकंदरीत ३ रुपयांत लाखो रुपयांची जागा मिळवा असाच प्रकार सुरू असून, अतिक्रमणामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून न. प.कडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मालकी हक्काच्या दुकानांपेक्षा अतिक्रमणधारकांच्या दुकानांची संख्या जास्त आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर अतिक्रमणधारक टपरी टाकत आहेत. शहरातील रस्त्यालगत मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले असून, रस्त्याने चालणे कठीण होऊन बसले आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा नगरसेवक केवळ बघायची भूमिका घेत असल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. अतिक्रमणधारकांकडून नगर परिषद रोज प्रत्येकी ३ रुपयांची पावती फाडून उत्पन्न घेत असल्याने नगर परिषदने या अतिक्रमणधारकांना वीज पुरवठा देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने एकप्रकारे संमती दिली असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगर परिषदचे पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघाला नाही. शहरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (फोटो)
----------------------------------------
सध्या प्राथमिकता कोरोनाला दिली जात आहे. कोरोनाचा उद्रेक थांबल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्या जाईल.
-गोपीचंद पवार, मुख्याधिकारी, न.प. तेल्हारा.
-------------------------------------------------------
सुरुवातीला कच्चे, नंतर पक्के अतिक्रमण
सुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभातात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयी-सुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे.