टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!
By admin | Published: July 6, 2014 12:25 AM2014-07-06T00:25:23+5:302014-07-06T00:45:49+5:30
पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी दिले. पाऊस लांबल्याच्या स्थितीत पर्यायी पेरणीसाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होऊन, महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच धरणांमधील जलसाठादेखील कमी होत असल्याने, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर आणखी काही दिवस पाऊस न आल्यास निर्माण होणार्या टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या १0 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास तालुका स्तरावर बैठका घेऊन, तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांनी पुढील तीन महिन्यांचा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. तसेच चाराटंचाईसंदर्भात माहिती घेऊन त्यासंदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच वैरण विकास आणि भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकार्यांना या बैठकीत देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, उपलब्ध चारा या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी आढावा घेतला. पावसाचा पत्ता नसल्याने आता मूग, उडीद ही खरीप पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे २0 जुलैपर्यंत पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी खरीप पिके घेता येतील, अशी माहिती कृषी विभागामार्फत या बैठकीत देण्यात आली. त्यानुषंगाने पाऊस आल्यास पर्यायी पीक पेरणीबाबत शेतकर्यांना माहिती देऊन, जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. या आढावा बैठकीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.