जलवाहिनीची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:07+5:302021-05-21T04:20:07+5:30
अकोला : अमृत अभियानअंतर्गत जलवाहिनीची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकत नाही. जलवाहिनी टाकताना रस्त्यांची ...
अकोला : अमृत अभियानअंतर्गत जलवाहिनीची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकत नाही. जलवाहिनी टाकताना रस्त्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे जलवाहिनीची अर्धवट कामे तातडीने निकाली काढण्यासह रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी तसेच कंत्राटदाराला दिले.
अमृत अभियानअंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्यासह नवीन आठ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने ‘एपी ॲॅण्ड जीपी’नामक एजन्सीची नियुक्ती केली. अमृत अभियानमधील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. शहरात मागील चार वर्षांपासून जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु अद्यापही जुने शहरातील विविध प्रभागांमध्ये ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. तसेच तोडफोड केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अद्यापही कंत्राटदाराने केली नाही. त्यामुळे ही कामे तातडीने निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे मजीप्राचे अधिकारी तसेच कंत्राटदाराची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आयुक्त निमा अरोरा यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या दालनात पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये महापौर अर्चना मसने, राजेश मिश्रा यांच्यासह सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, मजिप्राचे कार्यकारी अभियंता राठोड, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, उपअभियंता नरेश बावणे यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.
घरकुलांचा तिढा कायम
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक पात्र लाभार्थींच्या नावाने अधिकृत जागा नाहीत. लीज पट्ट्यासाठी शासकीय मोजणी करावी लागते. यासंदर्भात गुरुवारी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत विरोधी पक्षनेता साजिद खान, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, भाजप नगरसेवक अनिल मुरूमकार, अमोल गोगे, सेनेच्या नगरसेविका सपना नवले, वंचित आघाडीच्या नगरसेविका किरण बोराखडे यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीतून ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.