पाणीटंचाइ निवारणाची कामे तातडीने पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:30+5:302021-04-16T04:18:30+5:30
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा ...
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी गुरुवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत दिले.
जिल्हयातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाइच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइची समस्या गंभीर होणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन, पाणीटंचाइ निवारणाच्या कृती आराखड्यात मंजूर उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना या सभेत दिले. नियोजनाअभावी जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाइचा प्रश्न जाणवत असून, तेल्हारा तालुक्यातील काही पाणीटंचाइग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाइ निवारणासाठी बोअरवेलची कामे करण्यात यावी किंवा टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आलेल्या यासभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुभाष पवार, समितीचे सदस्य संजय अढाऊ, सुष्मिता सरकटे यांच्यासह जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व लघु सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात
अनियमितता; चौकशीचे निर्देश
जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी व पशुसंर्वर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी समितीच्या मागील सभेत केली होती. त्यानुषंगाने यासंदर्भात काय कार्यवाही झाली, अशी विचारणा करीत जलवाहिनीच्या कामातील अनियमिततेची २२ एप्रिल रोजी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी सभेत दिले.