घरकुल लक्षांक : काही गावे तुपाशी तर काही उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:30 PM2019-02-05T12:30:34+5:302019-02-05T12:30:53+5:30
अकोला : समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचा लक्षांक गावनिहाय वाटप करताना काही पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाºयांनी मनमानी केल्याने काही गावांना तुपाशी तर काही गावांना उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला आहे.
अकोला : समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचा लक्षांक गावनिहाय वाटप करताना काही पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाºयांनी मनमानी केल्याने काही गावांना तुपाशी तर काही गावांना उपाशी ठेवण्याचा प्रकार घडला आहे. अकोला पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने घडलेल्या या प्रकारात काही गावांवरचे प्रेम अक्षरक्ष: उतू गेल्याचे दिसून येत आहे. तर त्याचवेळी इतर गावांना एकच घरकुल देण्याचा करंटेपणाही घडला आहे. त्यासाठी लाभार्थींकडून काही गावातील सरपंच, सचिवांसह दलालांनी लाखो रुपये वसूल केले आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सामाजिक न्याय विभागाकडून घरकुलांचा पंचायत समितीनिहाय लक्षांक ठरवून दिला. ग्रामीण विकास यंत्रणेने गावनिहाय लक्षांक वाटपाची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे सोपवली. त्याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये झाला आहे. काही गावातील सरपंच, सचिवांना हाताशी धरून किती घरकुलांसाठी लाभार्थींकडून रक्कम मिळू शकते, याचा अंदाज घेण्यात आला. त्यानुसार गावनिहाय घरकुलांची संख्या देण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर झाले. काही गावांतील दलालांनी त्यासाठी वसुली केली. ग्रामपंचायतींना घरकुलाचा लक्षांक देताना मिळालेल्या हिशेबानुसार संख्या ठरवण्यात आली. त्यासाठी घरकुल लक्षांक वाटपाचे निकष, दिशानिर्देश बाजूला ठेवण्यात आले. प्रामुख्याने हा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात घडला. इतर पंचायत समित्यांमध्ये चौकशी केल्यास ते पुढे येणार आहे.
- घरकुलांची खिरापतप्राप्त गावे
अकोला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी जी.आर. बोंडे यांनी अत्यंत घाईत केलेल्या गावनिहाय घरकुल वाटपात विविध गावांना खिरापतीसारखे वाटप झाले. त्यामध्ये बोरगावमंजू ग्रामपंचायतीला ५६, त्यानंतर उगवा येथे ३८ घरकुले देण्यात आली. पळसो बुद्रूक -३५, पातूर नंदापूर-२८, मजलापूर-२८, घुसर-२१, डोंगरगाव-२०, चिखलगाव-२०, कुरणखेड-१८, कुंभारी-१८, भौरद-१८, मोरगाव (भाकरे)-१७, कोठारी-१७, म्हैसांग-१७, लाखनवाडा-१७, सांगळूद-१६, नवथळ-१५, मासा-१५, दहीगाव गावंडे-१४, रामगाव-१२.
- अल्प लक्षांकांमुळे वंचित गावे
खिरापत मिळालेल्या काही गावांच्या लोकसंख्येएवढीच असलेल्या गावांमध्ये अत्यल्प घरकुले देण्यात आली. त्यामध्ये आपातापा-३, गोरेगाव बुद्रूक-३, कापशी तलाव-३, येवता-३, लोणाग्रा-३, निराट-१, वैराट-२, बादलापूर-२, दुधाळा-२, दोडकी-३, निंबी-२, पाळोदी-४, सुकोडा-३, टाकळी जलम-१ याप्रमाणे घरकुले देण्यात आली. केवळ वसुलीसाठी विषम संख्येने घरकुल वाटप केल्याने हा प्रकार नव्याने रूजू झालेले गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी थांबवला. गावनिहाय घरकुलांच्या लक्षांकांचे फेरवाटप करण्याचे नियोजन करत तसा आदेश त्यांनी तयार केला आहे.