मनपा अस्थिर करण्याचा घाट; १६ अभियंत्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:43+5:302021-06-20T04:14:43+5:30
महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मध्यंतरी १४ कंत्राटी आराेग्य निरीक्षक व ११ संगणक चालकांची सेवा बंद केली. आयुक्तांच्या निर्णयामुळे ...
महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मध्यंतरी १४ कंत्राटी आराेग्य निरीक्षक व ११ संगणक चालकांची सेवा बंद केली. आयुक्तांच्या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपसह इतरही राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यात भरीस भर आयुक्तांनी १ जूनपासून पडीक वाॅर्ड बंद केल्याने प्रभागांमधील साफसफाईची सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे पडसाद १४ जून राेजीच्या विशेष सभेत उमटले हाेते. सत्तापक्षातील पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा न करताच आयुक्त अराेरा एकतर्फी निर्णय घेत असल्याची भावना मागील काही दिवसांपासून सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी व आयुक्तांमधील वाद शमण्याची काेणतीही चिन्हं दिसत नसतानाच आता बांधकाम विभागातील १६ कनिष्ठ अभियंत्यांच्या झाेननिहाय बदल्या करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंतर्गत वादातून बदलीचे कारस्थान
मनपात आउट साेर्सिंगमार्फत झाेननिहाय प्रत्येकी चार यानुसार १६ कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. यातील काही अभियंते बांधकाम विभागातील काडीबाज अधिकाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. इतर अभियंते नियमांवर बाेट ठेवून काम करणे पसंत करतात. त्यामुळे एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षे काम करणाऱ्या अभियंत्यांची बदली करणे अत्यंत गरजेचे असल्याचा मुद्दा आयुक्त अराेरा यांना पद्धतशीरपणे पटवून देण्यात आला.
भविष्यातील विकासकामे ‘टार्गेट’
आगामी काही दिवसांत शहरातील काही विशिष्ट झाेनमध्ये काेट्यवधी रुपयांची विकासकामे निकाली काढली जाणार आहेत. त्यावर देखरेख ठेवून त्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याच्या मानसिकतेतून कनिष्ठ अभियंत्यांच्या बदलीसाठी खटाटाेप करण्यात आल्याची माहिती आहे.
...तर आयुक्तांच्या अडचणी वाढणार
मान्सूनपुर्व नाले सफाईचे कंत्राट मर्जीतील एका कंत्राटदाराला मिळवून देण्यासाठी या विभागातील अधिकाऱ्याची धावपळ लपून राहिली नाही. आज राेजी नाले सफाईचा फज्जा उडाला असून, नगरसेवकांमध्ये राेष आहे. अशास्थितीत केवळ अंतर्गत वादापायी कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या हाेत असतील तर आयुक्तांच्या अडचणीत वाढ हाेण्याचे संकेत आहेत.