महान येथे गोदामासह गोठ्याला आग
By admin | Published: April 3, 2017 08:22 PM2017-04-03T20:22:09+5:302017-04-03T20:22:09+5:30
अचानक लागलेल्या या आगीत गोदामातील कडबा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाले आहे. तर गोठ्यातील बैल भाजला आहे.
महान : येथील गजानन मोतीराम सरोदे यांच्या तेलीपुरास्थित निवासस्थानामागील गोदामासह गुरांच्या गोठ्याला ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अचानक आग लागली. यात गोदामामधील कडबा व शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. या आगीत गोठ्यामधील एक बैल भाजला आहे.
येथील गजानन मोतीराम सरोदे यांच्या निवासस्थानामागे त्यांच्या मालकीचे शेत असून, या शेतामध्ये गुरांसाठी चारा साठवण करण्यासाठी गोदाम व बैलाचा गोठा बांधलेला आहे. या गोदाम व गोठ्याला लागलेल्या आगीत कुटार, कडब्यासह शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाली. तसेच ४० हजार रुपये किमतीचा बैल आगीत भाजला गेला. यामुळे गजानन सरोदे यांचे जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदाम व गोठ्याला आग लागल्याचे मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा केला. तो ऐकून तेलीपुरा, माळीपुरा येथील नागरिकांनी एकत्र येऊन आग विझविण्यास मदत केली. ही आग आटोक्यात येत नसल्याने वीज कंपनीच्या पॉवर हाउसला संपर्क करून थ्री फेजचा वीज प्र्रवाह सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर मोटार पंपाच्या मदतीने आग विझविण्यात आली. आगीमुळे अन्य कुणाच्या घराचे नुकसान झाले नाही. या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती कळताच पटवारी गिरीधर झळके यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी आगीबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात पाठविला आहे.