विष प्राषन केलेल्या युवतीचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:26 PM2019-05-06T12:26:22+5:302019-05-06T12:27:29+5:30
नेहरू पार्क चौकात विष प्राशन केल्यानंतर या युवतीवर उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला: दीड वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, या जिद्दीने पेटलेल्या प्रेयसीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने या युवतीने नेहरू पार्क चौकात विष प्राशन केल्यानंतर या युवतीवर उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे. लग्नासाठी त्रास देत असल्याची तक्रार शुक्रवारी प्रियकराने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील खेट्री येथील रहिवासी पवन रामराव इंगोले हा युवक अमरावती येथे करिअर पॉइंट अकॅडमी येथे शिकण्यासाठी गेला. तिथे त्याची ओळख सोनाली नामक युवतीसोबत झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली. पवनने नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे तिला सांगितले. तिने सुरुवातीला हो म्हटले. तिने लग्नाचा तगादा लावला. तसेच २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर लिहिले ते २०२४ पर्यंत नोकरी लागल्यानंतर लग्न करेल किंवा तिच्या सोबत राहील. त्यानंतर परत त्यांच्यामध्ये लग्नाच्या कारणावरून चर्चा सुरू होती; परंतु प्रेयसीने शुक्रवारी प्रियकराकडे परत लग्नाचा तगादा लावला. तसेच ती पवनच्या गावात आली आणि ती त्याला शनिवारी दुपारी नेहरू पार्क चौकात भेटली. तिथेच तिने पवनला लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिला परत तेच सांगितले तरीही ती ऐकत नव्हती. तिने स्वत:जवळील पाण्याची शिशी काढली. त्यात असलेले विष प्राशन केले. हा प्रकार पाहून त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत आहेत.