मुलीने दिला मातेला मुखाग्नी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 02:41 AM2016-07-07T02:41:07+5:302016-07-07T02:41:07+5:30
ग्रामीण भागातही अनिष्ट परंपरेला फाटा देत मुलीने दिला मातेला मुखाग्नी.
वानखेड (जि. बुलडाणा) : अनिष्ट परंपरेला फाटा देत मातेला मुलीने मुखाग्नी दिला. ही घटना येथे सोमवारी घडली. येथील रहिवासी अन्नपूर्णा शंकर अंबुसकर (वय ९0) यांचे वृद्धापकाळामुळे ५ जुलै रोजी अल्प आजाराने निधन झाले.
वानखेड येथील रहिवासी अन्नपूर्णा अंबुसकर यांना कुसुम व विमल अशा दोन विवाहित मुली आहेत.
अन्नपूर्णाबाई यांच्या निधनानंतर मुलगा नसल्यामुळे तिरडी धरण्यासाठी व मुखाग्नी देण्यास कोण पुढे येणार, याची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र बराच वेळ होऊनही कोणीही पुढे न आल्याने दिवस मावळण्याच्या आत अंत्यसंस्कार व्हावे, यासाठी शेवटी अन्नपूर्णाबाईस असलेल्या दोन विवाहित मुलींपैकी मोठी मुलगी कुसूम भिकाजी इंगळे (रा.वाशिम) हिने पुढाकार घेऊन तिरडी धरली व आईच्या प्रेतास खांदा देऊन मुलाचे कर्तव्य निभावले.
त्यांनी पुढाकार घेतल्याने गावातील इतर लोकांनी साथ दिली. सायंकाळी ६ वा. अंत्ययात्रा निघून ७ वा. गावाबाहेरील हिंदू स्मशानभूमीत मुलगी कुसुम हिने मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार केले.