तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी; तणाव
By admin | Published: July 5, 2017 12:50 AM2017-07-05T00:50:01+5:302017-07-05T00:50:01+5:30
तक्रार घेण्यास टाळाटाळ: मध्यरात्री ‘एसपीं’नी घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा शहरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने, तसेच काल रात्री अचानक त्या तरुणीवर हल्ला करून लोखंडी वस्तू हातावर मारून जखमी केले. याबाबत पो.स्टे.ला तक्रार देण्याकरिता सदर युवती गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षक यांना फोनवरून आपबिती सांगितली. त्यावरून पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तेल्हारा पोलीस स्टेशनला पाठविले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक योगेश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला ‘तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकणार’, अशी धमकी तीन ते चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून मिळाली होती. ही बाब सदर युवतीने घरच्यांना सांगितली होती. तथापि, तिच्या घरच्यांनी सदर बाब एवढी मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष केले होते; मात्र ३ जुलैच्या रात्री सदर युवती घरच्या कामानिमित्त स्कुटीने शेगाव नाका येथे जात असताना युवतीच्या मागून टू-व्हीलरवरून आलेल्या दोन युवकांनी लोखंडी वस्तूने तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात सदर युवती जखमी झाली.
सदर बाब घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आली असता ती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. उद्या सकाळी या, सकाळी बघू, असे उत्तर मिळाले. यामुळे सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पोलीस अधीक्षक कलासागर यांनी तत्काळ दखल घेत संबंधित ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी मध्यरात्री तेल्हारा पोलीस स्टेशनला येऊन घटनेचे गांभीर्य जाणून घेतले. त्यानंतर सदर घटनेबाबत दोन अनोळखी युवकांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या ३५४ (ड), ३२३, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोमवारी मध्यरात्री तेल्हारा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरामध्ये विनयभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, पोलिसांचा वचक नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.