शासकीय वसतिगृहातील मुलींना वर्षभरापासून मिळाला नाही भत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:04 PM2019-03-29T14:04:21+5:302019-03-29T14:04:39+5:30
अकोला : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना गेल्या वर्षभरापासून स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही.
- संतोष येलकर
अकोला : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना गेल्या वर्षभरापासून स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही. यासोबतच गत फेबु्रवारीपासून निर्वाह भत्तादेखील मिळाला नाही. विद्यार्थिनी भत्त्याच्या लाभापासून वंचित असताना, यासंदर्भात तक्रारींकडे मात्र सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रतिवर्ष स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता आणि दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो; परंतु अकोल्यातील संतोषी माता मंदिराजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना सन २०१७-१८ या वर्षातील स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता अद्याप मिळाला नाही, तसेच दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता गेल्या फेबु्रवारीपासून मिळाला नाही. भत्ता रकमेच्या लाभापासून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थिनी वर्षभरापासून वंचित असताना, या समस्येसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींकडे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात आहे.
विद्यार्थिनींना असा दिला जातो भत्ता !
सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना प्रती वर्ष प्रत्येकी स्टेशनरी भत्ता ४ हजार रुपये, ड्रेसकोड भत्ता दोन हजार रुपये आणि दरमहा निर्वाह भत्ता ७०० रुपये दिला जातो; परंतु गत वर्षभरापासून शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्टेशनरी भत्ता व ड्रेसकोड भत्त्याची रक्कम मिळाली नाही.
शासकीय मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थिनींना वर्षभरापासून स्टेशनरी, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही. निर्वाह भत्तादेखील फेबु्रवारीपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याकडे सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात आहे. संबंधित समस्यांचे तातडीने निवारण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.
- अमोल सिरसाट
जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, अकोला.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना दिला जाणारा स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता निधीअभावी वर्षभरापासून प्रलंबित आहे. समाजकल्याण आयुक्तालयाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर भत्त्याची रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मागील महिन्यापर्यंत निर्वाह भत्त्याची रक्कम देण्यात आली आहे.
-अमोल यावलीकर, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.