मुलीची छेड; दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:43 AM2020-10-06T10:43:06+5:302020-10-06T10:43:22+5:30
Crime News घरात घुसून काठीने जबर मारहाण केली आहे.
बाळापूर : तालुक्यातील भिकुंडखेड येथे एका मुलीची गावातील मुलानेच छेड काढल्याच्या वादातून सोमवारी दुपारी दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये चार जण जखमी झाले. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मुलीचा एका युवकाने काही महिन्यांपूर्वी विनयभंग केला होता. हा युवक गावातील मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. मुलगी बाळापूर येथे आली असता त्याने हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात सोमवारी दोन गटात वाद उद्भवला. त्यामध्ये गुन्हा दाखल असलेला धनराज इंगळे व त्याच्या वयोवृद्ध वडिलांना अंकुश वानखडे, प्रदीप वानखडे, हिरामण वानखडे, दीक्षा वानखडे, लता वानखडे, आरती वानखडे, मणकर्णा वानखडे यांनी घरात घुसून काठीने जबर मारहाण केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. प्रदीप हरिभाऊ वानखडे यांच्या तक्रारीनुसार ते बाळापूर येथे वीज बिल भरण्यासाठी जात असताना आरोपी धनराज गजानन इंगळे, गजानन पंढरी इंगळे व त्याच्या जावयाने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला.