पित्यासह दोन मुलांना जन्मठेप
By Admin | Published: July 1, 2014 01:40 AM2014-07-01T01:40:34+5:302014-07-01T02:22:43+5:30
सांगवा मेळ येथील युवकाचे हत्याकांड; अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.
अकोला: आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून सांगवा मेळ येथील युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने पित्यासह त्यांच्या दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मूर्तिजापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या सांगवा मेळ येथे राहणारे अशोक रामराव सोळंके यांनी २९ एप्रिल २0१२ रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार २८ एप्रिल रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास त्यांचे भाऊ उमेश सोळंके यांच्यासोबत परिचित श्रीराम मोतीराम सोळंके व त्यांची मुले मोहन व संतोष सोळंके यांनी वाद घातला. दरम्यान, श्रीराम सोळंके आणि संतोष सोळंके या दोघांनी उमेशला पकडून ठेवले. आरोपी मोहन सोळंके याने जवळील चाकूने उमेशवर सपासप वार केले. उमेशला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने दवाखान्यात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशोक रमेश सोळंके यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी तिघांही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलिसांनी हत्याकांडाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या हत्याकांडाचा तपास पीएसआय दीप्ती ब्राह्मणे यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र व न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने साक्षीदार व ठोस पुराव्यांच्या आधारे तिघाही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबतच ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीला जखमी केल्यावरून आरोपी मोहन सोळंके याला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे यांनी काम पाहिले.