जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

By admin | Published: February 17, 2016 02:20 AM2016-02-17T02:20:20+5:302016-02-17T02:20:20+5:30

ग्रंथोत्सवातील परिसंवादात उमटला सूर.

To give direction to life is done by a teacher, Guru! | जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

Next

अकोला: मनुष्याच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा पडत असेल, तर वाचनाचा. एकदा नातेवाईक आपली साथ सोडतील, पण ग्रंथ हे आपल्याला सतत काही ना काही मार्गदर्शन करतात. यशाचं शिखर गाठायचं असेल, तर ज्ञान आवश्यक आहे आणि ते मिळवायचं असेल, तर वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून वाचनालय हे मंदिर व ग्रंथ हे दैवत मानले, तर प्रसादरूपी यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रंथाने मला काय दिले? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुहास कुळकर्णी (बाबूजी) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे व डॉ. किरण वाघमारे उपस्थित होते. परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना प्रा. संजय खडसे म्हणाले की, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ग्रंथ आणि पुस्तके करीत असतात. या ग्रंथरूपी गुरूमुळेच आज मी तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी एसडीओ म्हणून सर्वांसमक्ष उभा आहे. माझा हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी मी घालवतो. यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे म्हणाल्या की, पुस्तक वाचणे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न असतो. जीवनावर ग्रंथांचा प्रभाव पडतो म्हणजे काय, तर वाचन करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल. पुस्तक हातात घेतले की, आपली मानसिकता बदलते व आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लागतो. आपले विचार व्यक्त करताना डॉ. किरण वाघमारे म्हणाले की, ग्रंथ हे जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करीत असतात. जीवनातील अडचणीच्या काळात ग्रंथप्रेम कसे जपले, याबाबत त्यांनी आपला अनुभव कथन केले. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर सदैव अपडेट राहणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुहास कुळकर्णी म्हणाले की, ग्रंथांमुळे मनाची कवाडे उघडतात. शिल्पकार जशी मूर्ती घडवितो, त्याच पद्धतीने ग्रंथ आपले जीवन घडविण्यास कारणीभूत ठरतात. वेदांचा वेद तेव्हाच कळतो, जेव्हा वेदना कळतात. त्या वेदना उमजण्याचे सार्मथ्य ग्रंथांच्या वाचनामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार श्यामराव वाहूरवाघ यांनी मानले.

Web Title: To give direction to life is done by a teacher, Guru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.