शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:26+5:302021-05-10T04:18:26+5:30
शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी, मुलीच्या लग्नाची जबाबदारी अशाप्रकारची अनेक संकटे त्यांच्यापुढे उभी आहेत. यावर्षी मुगाचे ...
शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी, मुलीच्या लग्नाची जबाबदारी अशाप्रकारची अनेक संकटे त्यांच्यापुढे उभी आहेत. यावर्षी मुगाचे पीक हातचे निघून गेले. तरी मुगाचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करून शेतकऱ्यांनी एप्रिल २०१८ पासून शेतीच्या वीज जोडणीकरिता पैसे भरले असताना महावितरण कंपनीने अद्यापपर्यंत वीज जोडणी करून दिली नाही. शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअरवेल केले आहेत. परंतु वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. एकीकडे शासन मागेल त्या शेतकऱ्याला वीज देण्याच्या घोषणा करीत आहे. दुसरीकडे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. एप्रिल २०१८ पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीकरिता अर्ज केले आहेत, त्या शेतकऱ्यांना ताबडतोब वीज जोडणी करून देण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारण्यात येईल, असा इशारा अ. भा. मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी दिला आहे.