शेतकऱ्यांना सरसकट तातडीने मदत द्या! जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव मंजूर
By संतोष येलकर | Published: September 19, 2022 05:33 PM2022-09-19T17:33:06+5:302022-09-19T17:33:46+5:30
सभेत मंजूर झालेला ठराव शासनाकडे पाठविणार
अकोला: संततधार पाऊस आणि अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तातडीने पीक नुकसानीची मदत द्यावी, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात सतत पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती स्फूर्ती गावंडे यांनी सभेत केली. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने चार हेक्टर मर्यादेपर्यंत पीक नुकसानीची मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेता गोपाल दातकर यांनी केली.
पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेली १३० कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तातडीने पीक नुकसानीची मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत मांडला. हा ठराव सर्वानुमते सभेत मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.