पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:36+5:302021-07-24T04:13:36+5:30
अकोला: जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेत, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना ...
अकोला: जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेत, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना
तातडीची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ.सुरेश आसोले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वजित घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर आदी उपस्थित हाेते. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळेल, यासाठी प्रशासनाने काम करावे. तत्पूर्वी नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिल्या.
मदतीपासून कोणीही
वंचित राहू नये!
जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत वाटप करताना मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले रस्ते तत्काळ दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची कामे तत्परतेने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
शेती, पीक नुकसानीचे
सर्वेक्षण तातडीने करा!
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीचे, पिकांचे व खरडून गेलेली शेती असे वर्गीकरण करुन नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करा. यासाठी ड्रोनचा वापर करुन चित्रीकरणाची कामे प्राधान्याने करून नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत शासनास सादर करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी दिले.