एका प्रभागासाठी किमान १00 सफाई कर्मचारी द्या!
By admin | Published: March 25, 2017 01:42 AM2017-03-25T01:42:32+5:302017-03-25T01:42:32+5:30
अकोला महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची सभागृहात एकमुखी मागणी
अकोला, दि. २४- महापालिकेच्या हद्दवाढीमुळे प्रभागांच्या क्षेत्रफळात कमालीची वाढ झाली आहे. सफाई कर्मचार्यांच्या कामकाजाचा पूर्वानुभव लक्षात घेता, एका प्रभागासाठी किमान १00 सफाई कर्मचार्यांची गरज असल्याचे सांगत प्रशासनाने तयार केलेल्या ६0 कर्मचार्यांच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे आश्वासन देत प्रशासनाच्या प्रस्तावाला महापौर विजय अग्रवाल यांनी कार्योत्तर मंजुरी दिली.
सत्ता स्थापनेनंतर महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरालगतच्या गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे तसेच शहराची हद्दवाढ गरजेची असल्याने मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली. राज्य शासनाने ३0 ऑगस्ट २0१६ रोजी हद्दवाढीची अधिसूचना जारी करीत शहरालगतच्या १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश केला. हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग पुनर्रचनेदरम्यान प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळदेखील वाढले. नवीन प्रभागातील साफसफाईची समस्या व अपुरे मनुष्यबळ पाहता मनपा प्रशासनाने खासगी पुरवठादाराच्या माध्यमातून ३५0 किंवा आवश्यकतेप्रमाणे सफाई कर्मचार्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. एका प्रभागात ६0 सफाई कर्मचार्यांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मांडण्यात आला असता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. यापूर्वी दोन वॉर्ड मिळून एक प्रभाग होता. खासगी तत्त्वावर एका प्रभागात ३0 कर्मचारी होते. काही कामचुकार कर्मचार्यांमुळे साफसफाईची समस्या कायम राहत असल्याची परिस्थिती होती.
प्रभागांचे क्षेत्रफळ पाहता एका प्रभागासाठी किमान १00 ते १२५ सफाई कर्मचार्यांची गरज असल्याचा मुद्दा भाजपचे गटनेता राहुल देशमुख, सुमन गावंडे, बाळ टाले, विनोद मापारी, सारिका जयस्वाल, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके, मंगेश काळे, गजानन चव्हाण, काँग्रेसचे गटनेता साजीद खान, राकाँच्या उषा विरक, भारिपच्या गटनेत्या अँड. धनश्री देव यांनी लावून धरला. सर्वपक्षीय नगरसेवकांचा सूर पाहता यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा करून कर्मचार्यांच्या संख्येवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगत महापौर विजय अग्रवाल यांनी विषयाला कार्योत्तर मंजुरी दिली. तत्पूर्वी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन आयुक्त अजय लहाने, गटनेता साजीद खान व जीशान हुसेन यांनी स्वागत केले.
आठ तास काम करावेच लागेल!
सफाई कर्मचार्यांच्या संख्येत कितीही वाढ केली, तरी त्यांच्या कामाचा अवधी लक्षात घेता, साफसफाईची समस्या कायम राहत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. कामचुकार सफाई कर्मचारी केवळ दोन ते तीन तास काम करतात. त्यानंतर पळ काढतात. त्यामुळे यापुढे सफाई कर्मचार्यांना आठ तास काम करावेच लागेल, असा सज्जड दम महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दिला. त्याला महापौर विजय अग्रवाल यांनी दुजोरा दिला.