साक्षरतेला कौशल्याची जोड द्या!

By admin | Published: July 1, 2017 12:35 AM2017-07-01T00:35:58+5:302017-07-01T00:35:58+5:30

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील : रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा

Give literacy a skill! | साक्षरतेला कौशल्याची जोड द्या!

साक्षरतेला कौशल्याची जोड द्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्यापेक्षा त्याला कौशल्याची जोड दिली, तरच विकास होतो. म्हणून युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्याची कास धरावी, असे आवाहन पालकमंत्री तथा गृह, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन महामेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ मांडवगणे हे होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, की जगात कौशल्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या युवकांना कौशल्य शिक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यात कौशल्य विकास व उद्योजकता हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. या विभागाद्वारे प्रशिक्षित युवकांना कौशल्याची जोड देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. रोजगार मेळाव्याद्वारे अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ घेऊन संधीचे सोने युवकांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले.
विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून मुंबई, पुणे येथे जावे लागते, त्यावेळी त्यांना निवासाचा मोठा प्रश्न निर्माण होते. यासाठी पुणे, मुंबई, उल्हासनगर, ठाणे यासारख्या शहरात शासनाद्वारे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी वसतिगृह निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एम.डी. वानखडे, तर संचालन किशोर बुटेले यांनी केले. अमरावती येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक पी.टी. देवतळे, पुणे येथील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत निनावे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपसंचालक सुनील काळबांडे, सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, नगरसेवक आशिष पवित्रकार,भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ओळंबेसह अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक, शिक्षिका, विविध कंपनीचे प्रतिनिधी, युवक व युवती उपस्थित होते.

युवकांनी संधीचा फायदा घ्यावा - जिल्हाधिकारी
पालकांनी डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत असते. कर्तव्यदक्ष मनुष्य संधीचा फायदा घेऊन आपले कौशल्य वाढवून विकास करीत असतो, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, की आज रोजगार मागणारे हात, पुढे रोजगार देणारे हात होतील, यासाठी फक्त संधीची गरज असते ती आज आपणहून चालून आली आहे.

१२०० युवकांना मिळाला रोजगार
रोजगार मेळाव्यासाठी अकोला व लगतच्या जिल्ह्यांमधील तब्बल ३२०० बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या युवक-युवतींपैकी २७०० जणांच्या मुलाखती विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घेतल्या. या कंपन्यांची रोजगाराची गरज केवळ १२०० जागांची असल्याने मुलाखती घेण्यात आलेल्या २७०० जणांपैकी १२०० जणांना येत्या ५ जुलैपर्यंत कंपन्यांकडून आॅफर लेटर देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात पाच युवकांना डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते आॅफर लेटर देण्यात आले.

हजारो बेरोजगार युवकांची गर्दी
रोजगार मेळाव्यात १२०० जणांना रोजगार देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी आधीच २००० युवकांनी नोंदणी केली होती. त्यानंतर रोजगार मेळावा स्थळीही अनेक युवकांनी नोंदणी केली. केवळ अकोलाच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतूनही बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

या कंपन्यांनी केली पद भरती
टाटा मोटर्स, फिनोलेक्स केबल, ह्युंडाई, सेंट गोबीन, पीएमटी, भारत फोर्ज, व्हॅरेक पॉलिमर्स, कमिन्स, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, रॉन्च पॉलिमर्स, की आॅन, ३ एम, किहीन फ्लाय, प्रिमीनम, पुणा प्रेसिंग, पुणा सिम्स, अडेन्ट, व्हिजन, ड्रिमप्लास्ट, रॅन्ड डॅक, लेहर, एव्हरी डॅन्सन, डी. वाय. पॉवर, कल्याणी कार पेंटर, वालचंदनगर इंडस्ट्रिज, कल्याणी मॅक्स व्हील, फ्लॅश, शेल्डर, मास्क फ्लॅज इंडिया लिमिटेड, कल्याणी टेक्नो फोर्ज, इंडोरन्स ग्रुप, कोस्माफ्लिम.

Web Title: Give literacy a skill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.