शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:01 PM2020-10-23T17:01:54+5:302020-10-23T17:20:04+5:30
Akola News, Agitation शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीने आंदोलन करण्यात आले.
अकोला : अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मूग उडीद ही महत्त्वाची पिके उद्ध्वस्त झाली. सलग ८० दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने झाडांना कीड लागून तेही कुजले. कापसाचे झाड एक फुटापेक्षा अधिक वाढले नाही. पुरामुळे अनेक ठिकाणी शेतातला सुपीक मातीचा थर वाहून गेल्याने नवीनच संकट उभे राहिले आहे. जुने कर्ज कायम असताना नव्या कर्जामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज असून, सरकारी पातळीवर सगळीकडे अनास्थाच दिसून येतेय. याचा निषेध करतानाच शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीनेआंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या या आंदाेलनात सरकाराच्या नाकर्तेपणाबद्दल राेष व्यक्त करण्यात आला. या आंदाेलनानंतर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे की, दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा अतिवृष्टीने कंबरडे मोडल्याने तेथे पुन्हा आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजारो हेक्टरवरची पिके वाहून गेली आहेत. डोक्यावर बँकांचे व सावकारांचे कर्ज, त्यात हे अस्मानी संकट यामुळे आधीच देशोधडीला लागलेला शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणा निद्रिस्त असल्याचा आराेप केला आहे.
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली नाही, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांची दुःखं समजावून घेतली नाही. प्रत्यक्ष मदत मात्र अद्यापही जाहीर केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा व तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदाेलनात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, अरुंधती शिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, राजकुमार दामोदर आदी सहभागी झाले हाेते.