एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत!
By रवी दामोदर | Published: November 17, 2022 10:55 AM2022-11-17T10:55:27+5:302022-11-17T10:56:08+5:30
‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेले तसेच एव्हरेस्ट शिखर पार करणारे अशोक मुन्ने भारत जोडो यात्रेला समर्थन देत पातुर येथून यात्रेत सहभागी झाले आहेत.
अकोला :
‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेले तसेच एव्हरेस्ट शिखर पार करणारे अशोक मुन्ने भारत जोडो यात्रेला समर्थन देत पातुर येथून यात्रेत सहभागी झाले आहेत.
देशात जातीवरून होणारे राजकारण थांबले पाहिजे, तसेच सर्वांनी एकत्र येत देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नसून, केवळ एकतेचा संदेश देत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर वरून येत भारत जोडो यात्रेच्या ७१ व्या दिवशी ते पातूर येथून यात्रेत सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत नागपूर येथील डॉ. विजय रणदिवे, अभिजीत मानव आदी यात्रेत सहभागी होते.
अपंगांमध्ये अशोक मुन्ने ठरले होते भारतातून दुसरे!
आशिया खंडातून अशोक मुन्ने याच्यापूर्वी नेपाळचा सुदर्शन गौतम (२० मे २०१३) आणि भारताची अरुनिमा सिन्हा (२१ मे २०१३) या अपंग व्यक्तींनीही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. अरुनिमानंतर एव्हरेस्टवर जाणारा भारतातील तो दुसरा असून पुरुषांमध्ये पहिला आहे. सुदर्शन गौतमने ५७३२ मीटर, अरुनिमाने ८८४८ मीटर तर अशोकने ८५०० मीटर उंच शिखर पार केले.
२०१६ मध्ये केले होते शिखर पार!
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. अपयशी न होता त्याचा संघर्ष सुरूच होता. अखेर २०१६ मध्ये त्याने एव्हरेस्ट सर करून सर्वांना आश्चर्यकारक आणि सुखद असा धक्का दिला होता.