शंभर रुपये देऊन वृद्धेकडील दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:59 AM2020-01-20T10:59:39+5:302020-01-20T10:59:45+5:30
महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मणी आणि कानातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने पळविल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला शंभर रुपये दिले आणि पाकिटात ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मणी आणि कानातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने पळविल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकट भागातील रहिवासी लता दिलीप पाठणी (६५) ही वृद्ध महिला जैन मंदिरात दर्शनासाठी आली असताना २० ते २२ वर्ष वयोगटातील दोन युवक आले आणि त्यांनी पाठणी यांना आम्ही गरिबांना साडी आणि चपलांचे वाटप करतो असे म्हणत शंभर रुपये घ्या आणि पाकिटात ठेवण्यास सांगितले.
महिलेने ती नोट पाकिटात ठेवताच या दोघांनी हातचलाखीने महिलेच्या पाकिटातील १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
याप्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.