चार बैलांना जीवनदान; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:09+5:302021-05-29T04:16:09+5:30
अकोट : कत्तलीसाठी निर्दयीपणे दोरखंडाने बांधून गोवंशाची तस्करी करणारे वाहन दि. २८ मे रोजी अकोट ग्रामीण पोलिसांनी ...
अकोट : कत्तलीसाठी निर्दयीपणे दोरखंडाने बांधून गोवंशाची तस्करी करणारे वाहन दि. २८ मे रोजी अकोट ग्रामीण पोलिसांनी सातपुडा जंगल मार्गावर पकडले. या वाहनातील चार बैलांना जीवनदान मिळाले. मात्र, एक बैल मृत्युमुखी पडल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. या घटनेत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातपुडा जंगल मार्गाने धारणी येथून कत्तलीकरिता गोवंश अकोट शहरात येत असल्याची माहिती ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांना मिळाली. त्यानंतर रुधाडी टी-पाॅइंटजवळ पोलिसांना धारणीहून (क्र.एम. एच. ३० एल ३५०२) मालवाहू वाहन येताना दिसले. रुधाडी टी-पाॅइंट येताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहनचालकाने वाहन पळवून पुढे थांबवून जंगलमार्गाने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करूनही चालक फरार झाला. यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, वाहनात कत्तलीकरिता निर्दयीपणे दोरखंडाने बांधलेले पाच बैल आढळले. त्यापैकी एक बैल मृतावस्थेत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून चार बैल गोरक्षणला दिले, तर एका बैलावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी वाहनामध्ये चालकासोबत असलेला अमीर खान अहमद खान (रा. आयशा काॅलनी, अकोट) याला पकडण्यात आले. यावेळी त्याने पळून गेलेल्या वाहनचालकाचे नाव आझाद खान (रा. गाझी प्लाॅट अकोट) असल्याची माहिती दिली. याप्रसंगी पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे बैल व २ लाख ५० हजार किमंतीचे वाहन जप्त केले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.