५० फूट खोल विहिरीत पडलेल्या चितळाला जीवनदान
By Atul.jaiswal | Published: April 1, 2023 07:31 PM2023-04-01T19:31:44+5:302023-04-01T19:32:06+5:30
पाण्याच्या शोधार्थ शहरात आल्यानंतर दगडी पुलाजवळच्या हनुमान मंदिर परिसरातील ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या चितळाला वनविभागाच्या रेस्क्यू
अकोला :
पाण्याच्या शोधार्थ शहरात आल्यानंतर दगडी पुलाजवळच्या हनुमान मंदिर परिसरातील ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या चितळाला वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने जीवनदान दिल्याची घटना शनिवारी (१ एप्रिल) दुपारी ३.३० वाजताचे सुमारास घडली.
दगडी पूल परिसरातील हनुमान मंदिराच्या प्रांगणातील २० फुटापर्यंत पाणी असलेल्या विहिरीत एक चितळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी चितळ पडल्याची माहिती वनविभागाला कळविली. उपवन संरक्षक अर्जुला के. आर., सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे व वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांच्या निर्देशानुसार वनपाल गजानन इंगळे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, चालक यशपाल इंगोले, आला सिंह, अक्षय खंडारे, प्रियदर्शन पुंडगे हे साहित्यासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी विहिरीतील पाण्यात पडलेले चितळ जीव वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे त्यांना दिसले. वनविभागाच्या पथकाने सोबत आणलेले जाळे विहिरीत सोडले. चितळ जाळ्यात अडकताच त्याला विहिरीबाहेर खेचण्यात आले. सुमारे अर्धा तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बाहेर काढलेल्या चितळाला वनविभागाच्या वाहनात टाकून जंगलातील सुरक्षित अधिवासात नेण्यात आले. वाहनातून उतरताच चितळाने जंगलात धूम ठोकली.