कच्ची पावती देणे भोवले; दोन सावकारांचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:58+5:302021-07-20T04:14:58+5:30
तेल्हारा: कर्जदाराने सोने गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले; मात्र शासनाने जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ कर्जदाराला मिळाला नसल्याने ...
तेल्हारा: कर्जदाराने सोने गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले; मात्र शासनाने जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ कर्जदाराला मिळाला नसल्याने कर्जदाराने उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, उपनिबंधकांनी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी तक्रारकर्त्या कर्जदारांना त्यांचे सोने परत करून दोन सावकारांचा सावकारी परवाना रद्द करण्याचा आदेश दिल्याने जिल्ह्यातील सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
उदय विजयकुमार पिंजरकर, विजयकुमार ओंकारराव मुंडगावकर (दोन्ही रा.सराफा बाजार, ताजना पेठ, अकोला) या दोन्ही परवानाधारक सावकारांनी कर्जदारांच्या खातेवहीमध्ये नोंद घेतल्या नाहीत. कर्ज दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत विवरण पत्र देणे आवश्यक आहे, तसेच त्याची प्रत कार्यालयास देणे बंधनकारक आहे. कच्ची पावती देऊन नियमानुसार कर्जाचे विवरणपत्र देण्याबाबत तरतुदीचे उल्लंघन करून पक्की पावती न देता कच्ची पावती कर्जदाराला दिली. खोटे अभिलेख तयार करून तपासणीसाठी सादर केले आहेत. अशा परिस्थितीत या दोन्ही परवाना धारक सावकाराचा परवाना सुरू ठेवल्यास अनेक कर्जदारांची फसवणूक होऊ शकते, परिणामी शासनाच्या कर्जमाफीपासून कर्जदार वंचित राहू शकतात. त्यामुळे या दोन्ही सावकाराचा परवाना रद्द करण्याचा अहवाल राजेंद्र पालेकर उपनिबंधक सहकारी संस्था तालुका अकोला तथा सावकारांचे उपनिबंधक यांनी विनायक कहाळेकर जिल्हा उपनिबंधक सह. संस्था अकोला तथा सावकारांचे निबंधक यांच्याकडे सादर केला. त्यावर जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी सुनावणी घेत दोन्ही बाजू ऐकून घेत असताना तक्रारदार संतोष चव्हाण व अनिल चौधरी यांच्या तारणातील सोने परत केलेले आहे, तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावरून तक्रारीच्या अनुषंगाने कच्ची पावती दिली असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे विजयकुमार ओंकारराव मुंडगावकर व उदय विजयकुमार पिंजरकर यांचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांनी नुकताच दिला.