कोविड लस घेण्याचा पहिला मान मिळाल्याचा आनंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:03+5:302021-01-17T04:17:03+5:30
लस घेण्यापूर्वी इतरांप्रमाणेच मलाही थोडी भीती होती; पण ज्या धैर्याने कोविड काळात काम केले, त्याच धैर्याने आज ही लस ...
लस घेण्यापूर्वी इतरांप्रमाणेच मलाही थोडी भीती होती; पण ज्या धैर्याने कोविड काळात काम केले, त्याच धैर्याने आज ही लस घेतली. लस घेतल्यावरही मनात थोडी धाकधूक होती; पण लसीमुळे कुठलेच ‘रिॲक्शन’ झाले नाही, त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कोरोनावरील ही लस पूर्णत: सुरक्षित असून त्याचा कुठलाच दुष्परिणाम झाला नाही. त्यामुळे तुम्हीदेखील अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.
- डाॅ. आशिष गिऱ्हे, हाॅस्पिटल मॅनेजर, जिल्हा स्त्री रुग्णालय
कोरोनावरील लस ही पूर्ण सुरक्षित असून, त्याचा कुठलाच विपरीत परिणाम कोरोना योद्ध्यांवर झाला नाही. त्यामुळे इतरांनीही अफवांवर विश्वास ठेवून मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. मी स्वत: लस घेतली. कुठलाही दुष्परिणाम झाला नाही. पूर्णत: तंदरुस्त असून इतरांनाही लस घेण्यास प्रोत्साहित करीत आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय
पहिल्यांदाच कोरोनाची लस घेणार असल्याने उत्सुक्तेसोबतच मनात थोडी भीतीही होती. लस घेतल्यानंतर मनातील भीतीही नाहीशी झाली. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेण्याचा मान मिळाल्याने समाधानी आहे. कोरोनावरील लस पूर्णत: सुरक्षित असून, त्यापासून कुठलाच दुष्परिणाम झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी.
- शुभांगी नागदिवे, अधिपरिचारिका
कोविड लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेण्याचा मान मिळाला ही आमच्यासाठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. ज्या वैज्ञानिकांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन, संशोधन करून कोरोना प्रतिबंधक लस तयार केली, त्यांचे आज आभार मानावे वाटतात. ज्या लसीची गेल्या नऊ महिन्यांत प्रतीक्षा होती. ती अखेर मिळाली. या लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर विजय मिळावा याची प्रतीक्षा आहे. ही लस सुरक्षित असून, सर्वांनीच न घाबरता लस घ्यावी.
- अजयसिंह बघेल, क्ष-किरण तंत्रज्ञ
कोरोना काळातही रुग्णसेवा केली. त्यावेळेसही भीती होतीच; पण प्रत्येक वैद्यकीय सहकाऱ्यांनी धैर्याने रुग्णसेवा दिली. त्याच धैर्याने आज आम्ही पहिल्याच दिवशी कोविडची लस घेतली. लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर मोबाइलवर मेसेज मिळाला आहे. ज्या लसीची सर्वांना प्रतीक्षा होती ती अखेर मिळाल्याचे समाधान मला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता लाभार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घेण्यास समोर यावे.
- डाॅ. विजया पवनीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ