जीएमसीत आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंदच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:18 AM2021-04-06T04:18:17+5:302021-04-06T04:18:17+5:30

सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री बच्चू कडू ...

GM has no record of eight months of grain! | जीएमसीत आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंदच नाही!

जीएमसीत आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंदच नाही!

googlenewsNext

सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची झडाझडती घेतली. सर्वप्रथम मेसमध्ये उपलब्ध धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी उपलब्ध धान्यसाठ्याची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याची पाहणी केली असता आठ महिन्यांच्या धान्य पुरवठ्याच्या नोंदीच झालेल्या नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारला असता त्यांना स्पष्ट सांगता न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन या प्रकरणावर चौकशी बसविण्याच्या सूचना पालकमंत्री कडू यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या. यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मागणी महिनाभराची पुरवठा मात्र आठ दिवसांचाच

मेसमधील सावळागोंधळ उघडकीस आल्यानंतर, येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून केवळ आठ दिवसांचेच धान्य पुरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकारानंतर संबंधित पुरवठादारावरही चौकशी बसविण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

धान्याचा होणारा पुरवठा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, यासंदर्भात सावळागोंधळ सुरू असताना संबंधित कर्मचाऱ्याने मूग आणि तूर डाळ मिळून दररोज २३ किलो लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, हाच प्रश्न पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीला विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून आठ ते दहा किलोंचा उपयोग होत असल्याचे सांगितले. स्वयंपाकीला पुन्हा विचारल्यानंतर सांगितलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली.

Web Title: GM has no record of eight months of grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.