जीएमसीत आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० शस्त्रक्रिया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:14 AM2021-06-06T04:14:42+5:302021-06-06T04:14:42+5:30
जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहे. महिनाभरात या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, त्यातील बहुतांश ...
जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहे. महिनाभरात या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, त्यातील बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. सर्वोपचार रुग्णालयात सद्य:स्थितीत ७८ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५० रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. म्युकरमायकोसिसच्या गंभीर रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, यातील गंभीर रुग्णांवर दररोज शस्त्रक्रिया केली जात आहे. सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकाेसिसचे ३२ रुग्ण दाखल झाल्याची माहिती आहे. या रुग्णांमध्ये वाशिम, बुलडाण्यासह अमरावती आणि सुरत येथील रुग्णांचाही समावेश आहे. अकोल्यात उपचार घेण्यासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या वाढत आहे.
अशी आहे सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती
आतापर्यंत ७८ रुग्ण
११ रुग्ण डिस्चार्ज
१ मृत्यू
५० शस्त्रक्रिया
मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण नागपूरला संदर्भित
म्युकरमायकोसिसच्या बहुतांश जटील शस्त्रक्रिया या अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातच होत आहेत. यामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसोबच सायनस, दातांच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. मात्र, सर्वोपचार रुग्णालयात मेंदुरोग विकारतज्ज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचलेल्या फंगसच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे संदर्भित केले जात आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना नागपूरला संदर्भित करण्यात आले आहे.
म्युकरमायकोसिससाठी चार वॉर्ड राखीव
सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत सर्वाेपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिससाठी ४ वॉर्ड राखीव ठेवण्यात आले असून, त्यामध्ये ८० खाटा उपलब्ध आहेत.
सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियाही होत आहे. आतापर्यंत जवळपास ५० शस्त्रक्रिया झाल्या आहे. गंभीर रुग्णांना नागपूरला संदर्भित केले जात आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. फंगस आढळताच रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला