... अखेर ‘जीएमसी’ला मिळाला ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:10 PM2019-06-02T13:10:59+5:302019-06-02T13:11:08+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग कक्षाला अखेर ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’ मिळाल्याने हजारो दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग कक्षाला अखेर ‘क्लिनिकल सायकोलॉजिस्ट’ मिळाल्याने हजारो दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. शेकडो प्रलंबित अर्ज निकाली निघणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग कक्षाची स्थापना झाल्यापासून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे पद रिक्त होते. त्यामुळे हजारो मनोविकार रुग्णांचे अर्ज तपासणीविनाच पडून आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन क्लिनिकल सायकोलॉजिस्टचा शोध सुरू केला; परंतु या पदासाठी पात्र तज्ज्ञच मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. आॅनलाइन अर्ज करूनही मनोविकार रुग्णांची तपासणी होत नसल्याने त्यांना दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, दिव्यांग कक्षाला आठवड्यातून किमान दोन दिवस क्लिनिकल सायकोलॉजिस्ट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दिव्यांग आयुक्तांकडे करण्यात आली होती; परंतु तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे दिव्यांग आयुक्तालयाकडून सांगण्यात आले होते; मात्र हा प्रश्न जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मदतीने निकाली लागला असून, अकोल्यातच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सापडला आहे. त्यामुळे प्रलंबित शेकडो अर्ज निकाली निघणार असून, दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दर सोमवारी विशेष सेवा
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या मनोविकार रुग्णांची तपासणी दर सोमवारी केली जाणार आहे. पहिली विशेष सेवा सोमवार, १० जून रोजी दिली जाणार आहे. त्यानंतर दर सोमवारी ही सेवा दिली जाणार असून, शेकडो अर्ज निकाली काढण्यास मदत होईल.
प्रेरणा प्रकल्पांतर्गत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कार्यरत असून, आठवड्यातून एक दिवस ते दिव्यांग कक्षाला सेवा देणार आहेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत कार्यरत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दिव्यांग कक्षाला सेवा देणार आहेत. त्यामुळे प्रलंबित अर्ज निकाली लागणार आहेत.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.