‘जीएमसी’ने बोरगाव मंजू येथील स्वॅब आधी नाकारले, नंतर स्वीकारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:54 AM2020-07-15T10:54:23+5:302020-07-15T10:54:32+5:30
तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर महाविद्यालय प्रशासनातर्फे स्वॅब स्वीकारण्यात आले.
अकोला : बोरगाव मंजू येथून संकलित केलेले स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. व्हीआरडीएल लॅबमध्ये स्वॅब ठेवण्यास जागा नसल्याचे सांगत केवळ शंभर स्वॅब स्वीकारल्या जाणार असल्याचे रुग्णवाहिका चालकांना सांगण्यात आले. तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर महाविद्यालय प्रशासनातर्फे स्वॅब स्वीकारण्यात आले.
आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी बोरगाव मंजू येथे कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब संकलित करण्यात आले. येथून हे स्वॅब रुग्णवाहिकेद्वारे सर्वोपचार रुग्णालयात आणले गेले; परंतु सायंकाळी ७ वाजल्यामुळे आम्ही स्वॅब घेऊ शकत नसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटल्याची माहिती रुग्णवाहिका चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे संकलित केलेले स्वॅब आता कुठे ठेवायचे, अशा विचारात पडलेल्या रुग्णवाहिका चालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅबसमोरच ठिय्या मांडला. काही वेळानंतर येथील कर्मचाऱ्यांनी केवळ शंभर स्वॅब स्वीकाण्याची भूमिका व्हीआरडीएल लॅबमधील कर्मचाºयांनी घेतली; मात्र उर्वरित स्वॅब ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न रुग्णवाहिका चालकांनी उपस्थित केल्यावरही रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर प्रकरणाची सावरासावर करीत, येथील वैद्यकीय अधिकाºयांनी स्वॅब स्वीकारण्यास सुरुवात केली. यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार घडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील स्वॅब स्वीकारण्यास ‘जीएमसी’ने नकार दिला नाही. डॉ. शिरसाम आणि डॉ. घोरपडे यांनी स्वॅब घेण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली होती. गैरसमजातून हा प्रकार घडला.
- डॉ. मीनाक्षी गजभिये,
अधिष्ठाता, जीएसमी, अकोला