'जीएमसी'त ३० खाटांचा स्वतंत्र ‘कान-नाक-घसा’ वॉर्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:30 PM2019-12-31T13:30:41+5:302019-12-31T13:30:48+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे. ३० खाटा क्षमता असलेला हा वॉर्ड नवीन मर्च्युरी इमारतीलगत राहणार असून, लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
सध्याच्या टीबी वॉर्डाच्या जागेत शवविच्छेदन कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, या ठिकाणी नव्याने इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गत आठवड्यात क्षयरोग वॉर्डचे स्थलांतरण वॉर्ड क्रमांक २८ मध्ये करण्यात आले. या ठिकाणी ‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्षयरोग विभागाचा विस्तार करण्यात आला आहे. क्षयरोग वॉर्डाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी प्रस्तावित शवविच्छेदन कक्षाची नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीला लागूनच कान-नाक-घसा विभागाची नवी अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून मंजूर निधी प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील रुग्णांना ‘कान-नाक-घसा’ शी निगडित विविध आजारांवर अद्ययावत उपचार मिळणे शक्य होणार आहे.
‘ईएनटी’ला मिळणार ‘पीजी’ची मान्यता
जानेवारी २०२० च्या पहिल्याच आठवड्यात ‘एमसीआय’चे पथक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे. यावेळी पथकाद्वारे ‘कान-नाक-घसा’ विभागाचे मूल्यांकन करण्यात येणार असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच जागांना मान्यता देण्याची शक्यता आहे. या संदर्भात महत्त्वाची प्रक्रिया जीएमसी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. गत आठवड्यात एमसीआयने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ या विषयासाठी एमसीआयने ‘पीजी’ला मान्यता दिली होती. ‘ईएनटी’ला पीजीची मान्यता मिळाल्यास जीएमसीमध्ये पीजीच्या एकूण जागा ४० वर पोहोचणार आहेत.
कान-नाक-घसा विभागाच्या नव्या इमारतीला अजून, काही वेळ असला, तरी लवकरच पीजीची मान्यता मिळणार आहे. यासाठी एमसीआयचे पथक जानेवारीमध्ये पाहणीसाठी येण्याची शक्यता आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला