जीएमसी, लेडी हार्डिंगमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वितच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:30+5:302021-01-10T04:14:30+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील एक इमारत वगळल्यास इतर कुठल्याच इमारतींमध्ये ‘फायर फायटिंग ॲन्ड डिटेक्टर सिस्टीम’ ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील एक इमारत वगळल्यास इतर कुठल्याच इमारतींमध्ये ‘फायर फायटिंग ॲन्ड डिटेक्टर सिस्टीम’ कार्यान्वित नसल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. हीच स्थिती जिल्हा स्री रुग्णालयाची असून, येथील संपूर्ण सुरक्षेची मदार अग्निशमन सिलिंडवरच आहे. फायर ऑडिटच्या मुद्द्यावर दोन्ही रुग्णालयांमध्ये संभ्रम असल्याचे निर्दशनास आले.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्याने दहा शिशूंचा होरपडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या स्थितीची पाहणी केली. यावेळी दोन्ही रुग्णालयांमध्ये ‘फायर फायटिंग ॲन्ड डिटेक्टर सिस्टीम’च कार्यान्वित नसल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क केला असता, दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिटच झाले नसल्याचे सांगण्यात आले; परंतु आरोग्य विभागाच्या मते रुग्णालयाच्या इमारतींचे फायर ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपाच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रदेखील घेण्यात आले नसल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२०१६-१७ मध्ये झाले फायर ऑडिट!
जीएमसी प्रशासनाच्या मते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतींचे फायर ऑडिट २०१६-१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागाने खासगी कंपनीमार्फत केले. मात्र, त्यानंतर अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया झाली नाही.
फायर फायटिंग सिस्टीमची टाकी कोरडीच
सर्वोपचार रुग्णालयाच्या एका इमारतीमध्ये ‘फायर फायटिंग ॲन्ड डिटेक्टर सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक पाण्यासाठी इमारतीवर जवळपास २० हजार लिटर क्षमतेची टाकी बनविण्यात आली आहे. प्रथमदर्शनी ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचे दिसून आले, मात्र यंत्रणेच्या टाकीमध्ये पाणीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. पाण्याच्या टाक्या कोरड्या असताना आग नियंत्रणासाठी ही यंत्रणा कशी कार्यान्वित होईल, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
एसएनसीयूमध्ये नवजात शिशूंचा जीव धाेक्यात
सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) केवळ दोन अग्निशमन सिलिंडर आढळून आले. यातील एक कक्षाच्या बाहेर, तर दुसरे कक्षामध्ये होते. विशेष म्हणजे कक्षातील सिलिंडर हे एका खोलीत ठेवण्यात आलेले होते. कक्षात आग लागल्यास सिलिंडर असूनही त्याचा फायदा होणार नाही. जिल्हा स्री रुग्णालयात मात्र दर्शनी भागात अग्निशमन सिलिंडर असले, तरी ही सुविधा अपुरी ठरत असल्याचे दिसून आले.