कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांसाठी ‘जीएमसी’ला मिळाले २५ व्हॉव्हेल्स इंजेक्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 01:00 PM2020-07-11T13:00:29+5:302020-07-11T13:00:37+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणरक्षक असलेले २५ ‘व्होव्हेल्स’ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. यावर नियंत्रण मिळविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. अशातच शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणरक्षक असलेले २५ ‘व्होव्हेल्स’ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी आता प्रभावी औषधांचा वापर सुरू होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल झालेल्या जवळपास ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत; मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अतिगंभीर रुग्णांची संख्या जास्त होती. शिवाय हे रुग्ण उशिरादेखील दाखल झाले होते. या रुग्णांमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतरही गंभीर आजार होते. अशा परिस्थितीत त्यांचा जीव वाचविणे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा हा मृत्युदर रोखण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी २५ ‘व्हॉव्हेल्स’ इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी हे इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच जीएमसीचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर आहे. त्या दृष्टिकोनातून प्रभावी औषधांचा उपयोग करण्यावर भर असणार आहे. शासनाकडून २५ ‘व्हॉव्हेल्स’ इंजेक्शन जीएमसीला प्राप्त झाले. या व्यतिरिक्त जीएमसी स्तरावर इतरही इंजेक्शन आणि औषध खरेदी करण्याचे विचाराधीन आहे.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला