‘जीएमसी’त शस्त्रक्रियांसाठी टाळाटाळ; रुग्णांना मिळत आहे तारखेवर तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:54 PM2019-05-04T13:54:20+5:302019-05-04T13:54:25+5:30
अकोला: शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांची उपस्थितीच राहत नसल्याने रुग्णांना चक्क शस्त्रक्रियांसाठी तारखेवर तारीख दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकोला: शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांची उपस्थितीच राहत नसल्याने रुग्णांना चक्क शस्त्रक्रियांसाठी तारखेवर तारीख दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रियांसाठी होणारी चालढकल रुग्णांसाठी वेदनादायक ठरत आहे; मात्र त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातीलच नाही, तर शेजारील जिल्ह्यातील अनेक रुग्ण विविध शस्त्रक्रियांसाठी दाखल होतात. त्यांच्यावर उपचारही सुरू होतो; परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांकडेच वेळ नसल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील बहुतांश डॉक्टर त्यांच्या खासगी प्रॅक्टिसमधून वेळ मिळाल्यास सर्वोपचार रुग्णालयात वेळ देतात. हा वेळ शस्त्रक्रियांसाठी पुरेसा नसल्याने रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी तारखांवर तारखा देण्यात येत असल्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे रुग्ण वेदनेने त्रस्त होत आहेत. या मुद्यावर सामाजिक संघटनांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला; परंतु डॉक्टरांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे.
रुग्णांपर्यंत जन आरोग्य योजना पोहोचलीच नाही
सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांपर्यंत महात्त्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. योजनेची माहिती नसल्याने रुग्ण खासगी रुग्णालयात जाण्याचा विचारदेखील करत नाहीत. त्यामुळे येथेच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण दिवस काढत आहेत.
रुग्णसेवक संघटनेतर्फे निवेदन
सर्वोपचार रुग्णालायत रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारखांवर तारखा देण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष आशीष सावळे यांनी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांना निवेदन देण्यात आले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.
आपत्कालीन शस्त्रक्रिया सुरूच आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही शस्त्रक्रिया एखाद दिवस पुढे ढकलण्यात येतात; परंतु या शस्त्रक्रिया किरकोळ असतात.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला