‘जीएमसी’तून सर्वोपचार वेगळे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:51 PM2019-07-07T12:51:46+5:302019-07-07T12:52:18+5:30
‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार व्यवस्थित करण्यात येत नाहीत. पैसे देऊन पावती फाडल्यानंतर रुग्णांना बाहेरून औषध आणण्याचे सांगितले जाते. तसेच रुग्णांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि रुग्णालयांत अस्वच्छता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयात होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करून, पूर्वीप्रमाणे जिल्हा शल्यकित्सक कार्यालयांतर्गत सर्वोचार रुग्णालयाचा कारभार चालविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी सभेत केली. त्यांच्या या मागणीला समितीच्या इतर सदस्यांनीही समर्थन देत ‘जीएमसी’तून सर्वोचार रुग्णालय वेगळे करण्याची मागणी लावून धरली. सदस्यांच्या मागणीनुसार ‘जीएमसी’तून सर्वोपचार रुग्णालय वेगळे करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे, ग्रामीण भागातील समस्यांसह विविध मुद्यांवर समितीच्या सदस्यांनी सभेत प्रश्न उपस्थित केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला-बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह समिती सदस्य दामोदर जगताप, चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके, रामदास लांडे, गजानन उंबरकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.