गोरक्षण मार्गावरील वृक्षाला मिळाली नवसंजीवनी!
By admin | Published: July 11, 2017 01:08 AM2017-07-11T01:08:10+5:302017-07-11T01:41:34+5:30
विकास पर्वाला एक नवी दिशा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गोरक्षण मार्ग रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विकास कार्यात अडथळा असलेले वृक्ष पूर्णत: तोडले जात आहेत. सोमवारी अशाच एका धाराशायी होणाऱ्या वृक्षाला काही निसर्गप्रेमींनी पुनरुज्जीवन दिले.
मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ शशिकांत हांडे यांनी १७ वर्षांपूर्वी एक बदामाचे रोपटे लावले. रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात झाले. जिवापाड जपलेला वृक्ष आता धाराशायी होणार ही जाणीव होताच, शशिकांत हांडे यांनी स्वखर्चाने त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुढील कारवाई थांबविण्याची विनंती करून, त्यांनी वृक्षाला नवीन ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी ‘जेसीबी’ची व्यवस्था केली. मुळासकट काढलेल्या वृक्षाच्या प्रारंभी मोठ्या फांद्या कापण्यात आल्या. तद्नंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या पलीकडील खुल्या जागेवर खोल खड्डा करण्यात आला. मोठ्या फांद्या विलग केल्या असल्यामुळे मुळासकट काढण्यात आलेला बदामाच्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्यास वेळ लागला नाही. तत्काळ जवळच राहणारे सेंट्रल बँकेचे निवृत्त अधिकारी सोनवणे यांनी वृक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. या कार्यात हांडे यांना निसर्गप्रेमी प्रदीप गुरूखुद्दे, मधू जाधव, महेश चांडक, काटोले यांचे सहकार्य लाभले.
शहराचा विकास करताना अनेक वर्षांपासून उभे असलेले वृक्ष भुईसपाट केले जात आहेत; मात्र या निसर्गप्रेमींनी विकास पर्वाला एक नवी दिशा देणारे उदाहरण सर्व अकोलेकरांसमोर ठेवले आहे.