बोकडाची चोरी, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:50+5:302021-03-04T04:33:50+5:30
युवतीचा विनयभंग, गुन्हा दाखल अकोट: लग्न करण्याची मागणी करीत युवतीसोबत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग करणाऱ्या गजानन रमेश खोडके(३० ...
युवतीचा विनयभंग, गुन्हा दाखल
अकोट: लग्न करण्याची मागणी करीत युवतीसोबत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग करणाऱ्या गजानन रमेश खोडके(३० रा. बार्शीटाकळी) याच्याविरोधात अकोट पाेलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी अकोटातील यात्रा चौकात घडली.
आरटीईसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बोरगाव मंजू: खासगी शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३ मार्चपासून प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पालकांनी ऑनलाइन अर्ज करून आरटीई प्रवेशाचा लाभ घ्यावा.
संत रविदास महाराज जयंती
मूर्तिजापूर: मातोश्री शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाच्या युथ केअर फाउंडेशनच्यावतीने परिवहन आगारात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक अंबुलकर, भाजप शहर उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, अतुल इंगळे, राहुल वानखडे, गौरव पवाडे, संतोष घोगरे उपस्थित होते.
बाळापूर तालुक्यात शेततळे, गाव तलाव होणार
बाळापूर: बीजेएसच्यावतीने बाळापूर तालुक्यात शेततळे, गाव तलावांचे पुनरूज्जीवन होणार आहे. या कामांसाठी बीजेएस मशीन उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी बीजेएसचे समन्वयक सुभाष गादिया, नितीन राजवैद्य यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांविरूद्ध पोलिसांची कारवाई
बार्शीटाकळी: शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मंगळवारी बायपास चौक येथे दंडात्मक कारवाई करण्यात आली. मंगळवारी १२ नागरिकांविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नगरपंचायत अधिकारी संतोष कदम, तेजराव चव्हाण, तलाठी रामेश्वर हातोलकर यांनी केली.
जामठी परिसरात ११ पॉझिटिव्ह रूग्ण
जामठी: प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत २१ ते २७ फेब्रुवारीपर्यंत कोरोना तपासणी शिबिरे घेण्यात आली. यात २६३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात जामठी बुद्रूक, दहातोंडा, तुरखेड, हिरपूर येथे ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
खड्ड्यामुळे अपघात, महिला जखमी
खिरपुरी बुद्रूक.: बाळापूर तालुका भाजप महिला आघाडीच्या सरचिटणीस जयश्री राधाकृष्ण दांदळे या दुचाकीने जात असताना, निमकर्दा-उरळ मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या जखमी झाल्या. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण उत्साहात
पातूर: येथील प्रोफेशनल करिअर ॲकेडमीच्यावतीने पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनात सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व मोफत प्रशिक्षण पार पडले. यात सुरज गवई यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
लागवड केलेले तीळाचे पीक उगवलेच नाही
चान्नी: परिसरात उन्हाळी तीळ पिकाची लागवड करून काही दिवस उलटल्यानंतरही तीळाचे पीक उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तीळाचे बियाणे बोगस निघाल्याने, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रस्त्याची दुरवस्था, वाहनचालक त्रस्त
वणी वारूळा: अकोट-अकोला रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्याचे तुकड्यांमध्ये काम करून अर्धवट सोडून देण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
शेती मशागतीच्या कामाची लगबग
मुंडगाव: परिसरात खरीप, रब्बीचा हंगाम संपला असून, आता शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. परिसरातील शेतकरी वखरणी, डवरणी, नांगरटीसह काड्या फणे वेचण्याच्या कामाला लागले आहेत. ट्रॅक्टर, बैलजोडीने शेतीची मशागत करण्यावर भर देण्यात येत आहे.
वीज बिल माफ करण्याची मागणी
खानापूर: कोरोना काळात नागरिकांना अव्वाच्यासव्वा दराने वीज देयके पाठविण्यात आली. याकाळात अनेकांचा रोजगार, उद्योगधंदे बंद पडल्याने, वाढीव वीज देयक कसे भरावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शासनाने वीज बिल माफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.