‘देव तारी, त्याला कोण मारी’: कार उलटूनही १७ महिन्यांच्या बाळासह पाच जण सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:43+5:302021-07-29T04:19:43+5:30
निहिदा : वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका १७ वर्षीय बालकाला कारंजा येथील खासगी हॉस्पिटलमधून अकोला येथे पुढील उपचारासाठी घेऊन ...
निहिदा : वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका १७ वर्षीय बालकाला कारंजा येथील खासगी हॉस्पिटलमधून अकोला येथे पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना कारंजा-अकोला मार्गावर पिंजरनजीक रात्री दोन वाजता कारच्या समोर रानडुक्कर आडवे आल्याने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता, की कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने या वाहनातील १७ महिन्यांच्या बालकासह पाच जण सुखरूप आहेत. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीची प्रचिती यामधून झाली आहे.
मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास जीवरक्षक दीपक सदाफळे यांना पिंजर येथील आशिष मानकर यांनी अपघातातबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाब पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी घटनास्थळ गाठले. अपघातातील जखमींची विचारणा केली असता वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोड येथील कुटुंब हे १७ महिन्यांच्या बाळाला कारंजा येथील खासगी हाॅस्पिटलमधून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार अकोला येथे उपचारार्थ घेऊन जात होते. कारंजा-अकोलामार्गे जात असताना पिंजरनजीक कारसमोर रानडुक्कर आडवे आल्याने अपघात होऊन कार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून, बाळासह पाच जण सुखरूप आहेत. जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी त्या कुटुंबास घेऊन अकोला येथे रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत बाळही सुखरूप असल्याची माहिती, पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.