सापांच्या दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात - बाळ काळने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:04 PM2019-08-04T22:04:02+5:302019-08-05T12:15:41+5:30
नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली.
अकोला : साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. पूजन करून त्यांना दूध पाजण्यात येते; मात्र सापांच्या अशा दैवतीकरणामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली.
प्र. नागपंचमीला सापाला दूध पाजणे योग्य आहे का?
बाळ काळणे - नागपंचमीला नागरिक मोठ्या आस्थेने सापाला दूध पाजतात; पण दूध हे सापाचे अन्न नाही. साप पूर्णत: मांसाहारी असून, दूध प्यायल्याने सापांचा जीव धोक्यात सापडतो. साप हा निसर्गाचे संतुलन राखत असल्याने तो शेतकºयांचा मित्रच समजला जातो; पण नागपंचमीच्या नावावर त्याला दूध पाजण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते ती चुकीचीअसल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले.
प्र. वारुळाचे पुजन करण्याची प्रथा योग्य आहे का ?
बाळ काळणे - शहरात हा प्रकार कमी झाला असला, तरी शहरालगतच्या भागासह दुर्गम भागात वारुळाचे पूजन आजही केले जाते. यात काही गैर नाही किंवा त्याला विरोधही नाही. हो धार्मिक सणांशी निसर्ग संतुलनाची सांगड असल्याने हे व्हायला हवे; पण आपल्या कुठल्याही कृत्यामुळे सापांच्या प्रजातीच नष्ट होण्याच्या मार्गावर जात असेल, तर या प्रथा बंदच झालेल्या बºया.
प्र. सापांच्या संरक्षणासाठी काय करावे?
बाळ काळणे - साप हा शेतकºयांचा मित्र असून, निसर्ग संतुलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो; पण धार्मिकतेच्या नावाखाली सापांचे दैवतीकरण करण्यात आले. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मानव जातीप्रमाणेच सापांच्या प्रजातीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सापांच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे सण साजरे करा; मात्र सापांचे दैवतीकरण करून त्यांचा जीव धोक्यात टाकू नका, असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी नागरिकांना केले.
कर्करोगाशी लढत देतानाच सापांना जीवनदान
सर्पमित्र बाळ काळणे यांना डिसेंबर २०१८ मध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग असल्याचे कळताच पायाखालची जमीनच सरकली होती. या अवस्थेत असतानाही त्यांनी वन्यजीव संरक्षणाचे कार्य मोठ्या जिद्दीने अन् खंबीरतेने सुरू ठेवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्करोगावर मात करीत सापांसोबतच इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे प्राण वाचविणारे ते राज्यातील एकमेव सर्पमित्र असावेत.